Saturday, May 3, 2014

महिला अत्याचारांवर भाष्य करणारा 'निखारे' गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न

महिला अत्याचारांवर भाष्य करणारा 'निखारे' 
गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न  

स्पर्श.. जन्माला येताच शब्द कळण्याआधी संवाद साधण्याचं पाहिलं माध्यम. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या स्पर्शाचे संदर्भ, अर्थ बदलत जातात. त्यातही मुलीच्या आयुष्यात तर थोडे जास्तच. जन्माला येताच होणारा आईचा प्रेमळ स्पर्श.. आजी आजोबांनी आशिर्वाद देतानाचा स्पर्श… बाबांनी प्रेमाने जवळ घेताना, हक्काने कान पिळताना होणारा स्पर्श... वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हे वेगवेगळे स्पर्श प्रत्येक मुलीला हवेहवेसे वाटत असतात, नको असतो तो फक्त एक स्पर्श… वखवखलेला, वासनेने बरबटलेला, शिसारी आणणारा. जळगाव सेक्स स्कँडल, खैरलांजी प्रकरण, दिल्ली सामुहिक बलात्कार, अल्पवयीन मतीमंद मुलीवर झालेला अत्याचार रोज वर्तमान उघडलं कि, या अशाच बातम्या नजरेला पडतात. त्यांची संख्या एवढी भीषण आहे की, आता त्या वाचून वाटणारी अस्वस्थता कमी होत चालली आहे की काय अशी शंका येऊ लागलेली आहे. कुठल्या दिशेला चाललोय आपण? आणि या सगळ्या परीस्थितीवर उत्तर काय ? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आगामी 'निखारे' या मराठी सिनेमातून करण्यात येतोय. 'चाणक्य क्रिएशन्स' आणि 'के फोर इंटरप्रायझेस' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अंजली आणि निलेश गावडे यांनी केली आहे.

सचिन देव दिग्दर्शित निखारे चित्रपटाचा मुहूर्त मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू यांच्या हस्ते गीत ध्वनीमुद्रणाने नुकताच करण्यात आला. आमदार डॉ. विनोद घोसाळकर हे प्रमुख अतिथी व चित्रपटाची टीम उपस्थित होती. तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक व सायली सहस्त्रबुद्धे या चार नायिकांच्या प्रमुख भूमिका असून या ध्वनीमुद्रण प्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी अमित राज यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली मंदार चोळकर लिखित गीत आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं. 
काही केल्या सर ना हे नशिबाचे भोग 
विचारास जडलेला विकारांचा रोग 
गहाण ठेवला सूर्य अंधारल्या रानी 
ठिगळाला भोक पडे अशी जिंदगानी..  

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करणाऱ्या या गीतातील आर्तता गायक आदर्श शिंदे यांनी तितक्याच तीव्रतेने गीतात उतरविली आहे. सचिन दरेकर यांनी या चित्रपटाचे कथा लेखन केले आहे. राजा सटाणकर चित्रपटाचे छायांकन करणार असून संतोष फुटाणे चित्रपटाचे कला दिग्दर्शन तर मृणाल परब या कॉस्च्युम डिझाईन करणार आहेत. 

सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने 'चाणक्य क्रिएशन्स' संस्थेने यापूर्वी अनेक मालिका, लघुपट व कार्यक्रमांची यशस्वी निर्मिती केली आहे. याच दिशेने पुढचे पाऊल टाकत 'निखारे' चित्रपटाच्या निर्मितीद्वारे  'चाणक्य क्रिएशन्स' कंपनीने आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. बलात्कार आजच्या समाजाला लागलेली भयंकर, विकृत अशी किड आहे. या अत्याचाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहून त्या बदलचा कठोर कायदा होणे गरजेचे आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून बलात्कार करण्याविरुद्ध एक मोहीम आहे, असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही. मे अखेरीस 'निखारे' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरवात होईल. 

No comments:

Post a Comment