आगामी ५७ व्या बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त कर्मचारी कल्याणाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करत बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन (BOIOA) तर्फे आज मुंबई येथील बँक ऑफ इंडिया मुख्यालयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये बोन मिनरल डेन्सिटी, ऑडिओमेट्री, ईएनटी, युरोफ्लोमेट्री, अस्थिरोग, वेदना व्यवस्थापन, आहारतज्ज्ञ मार्गदर्शन यांसह विविध विशेष वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे ६३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा उत्स्फूर्त लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक श्री. राजगोपाल, श्री. सुब्रत कुमार, श्री. राजीव मिश्रा व श्री. प्रमोद द्विवेदी, तसेच मुख्य दक्षता अधिकारी (CVO) श्री. ललित तनेजा, बँकेचे अनेक मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हा उपक्रम BOIOA चे अध्यक्ष श्री. अँटोन सल्डान्हा आणि सरचिटणीस श्री. निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. कर्मचारी आरोग्य व सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देण्याच्या असोसिएशनच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे हे द्योतक असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक श्री. रजनीश कर्नाटक यांनी ऑफिसर्स असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विशेषतः सरचिटणीस श्री. निलेश पवार यांनी अधिकारी हित डोळ्यासमोर ठेवून या आरोग्य शिबिराची केलेली संकल्पना व त्यासाठी घेतलेले परिश्रम यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. उत्तम आरोग्य हे वैयक्तिक आनंदाबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचेही द्योतक असल्याचे सांगत प्रत्येक अधिकाऱ्याने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या मनोगतात सरचिटणीस श्री. निलेश पवार यांनी बँक राष्ट्रीयीकरण चळवळीच्या ऐतिहासिक महत्त्वाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेली अनेक दशके देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मोलाचे योगदान दिले असून, ही जबाबदारी पार पाडताना अनेक बँक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आरोग्याविषयी जागरूकता ही प्रत्येक अधिकाऱ्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, कारण निरोगी बँक अधिकारी-कर्मचारी सक्षम संस्था, समाधानी ग्राहक आणि सशक्त राष्ट्र उभारण्यात अधिक प्रभावी योगदान देऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment