Tuesday, December 24, 2019

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला अण्णासाहेब देऊळगावकर जन्मशताब्दीपूर्ती सोहळा


मराठी चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या चित्रपट लेखकगीतकारनिर्माते अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नुकत्याच एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या आठवणींना उजाळा देत  अण्णासाहेब यांच्याविषयीचे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. दीपप्रज्वलनाने व अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात झाली.
‘यशाचा अहंकार न झालेला मराठी चित्रपटसृष्टीतला एकमेव माणूस’ असे सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी अण्णांच्या कार्यशैलीचा गौरवोद्गार यावेळी केला. बहुश्रुत व्यक्तिमत्व असलेल्या अण्णांचे कायमच अर्थपूर्ण मार्गदर्शन लाभल्याचे अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी यावेळी सांगितले. बालकलाकार म्हणून अण्णांसोबत काम करण्याची मिळालेली संधी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांनी अण्णांनी दिलेल्या भाकरवडी आणि आंबाबर्फीची आठवण आवर्जून सांगितली. लेक चालली सासरला’ हा चित्रपट माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा चित्रपट ठरला. कारण या चित्रपटावेळी मला अण्णासाहेब भेटले. त्यामुळेच मी ‘धुमधडाका’ करु शकलो असं सांगताना ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी लेक चालली सासरला’  या चित्रपटातील भन्नाट संवादाचा किस्सा उपस्थितांना यावेळी सांगितला. अण्णासाहेब देऊळगावकर यांची कन्या प्रीती वडनेरकर यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट  महामंडळाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानताना आपल्या हृद्य आठवणींच्या माध्यमातून अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या वेगवेगळया पैलूंचे दर्शन मनोगतातून घडवले. चित्रपटसृष्टीतला ‘देवमाणूस’ अशा शब्दात अभिनेते दिपक देऊळकर यांनी अण्णांच्या स्मृती जागवत त्यांच्या आशीर्वादामुळेच घडल्याचे सांगितले.
याप्रसंगी अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या जीवनपटाचा आढावा घेणारी कलायोगीची कर्तृत्वगाथा ही चित्रफित दाखवण्यात आली. तसेच विद्या प्रकाशनचे अवधूत जोशी यांच्या हस्ते मायाबाजार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते महेश कोठारे, दिपक देऊळकर, पितांबर काळे, प्रेमाकिरण, विवेक देशपांडे, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांसारख्या अनेक मान्यवरांसह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार, संचालिका वर्षा उसगांवकर, सहकार्यवाह विजय खोचीकर, संचालक सतीश रणदिवे व मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment