Wednesday, February 25, 2015

'कलर्स मिक्ता २०१५' चा दिमाखदार सोहळा दुबईत संपन्न
कलेच्या प्रांगणातील मानाचा समजला जाणारा 'मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅण्ड थिएटर अवाॅर्डस' म्हणजेच 'कलर्स मिक्ता २०१५' सोहळा नुकताच दुबईत मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंतांच्या कर्तृत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेणारा हा सोहळा १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान रंगला होता. यंदाचा 'गर्व महाराष्ट्राचा' हा पुरस्कार कथा-पटकथाकार-लेखक सलीम खान यांना मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सलीमसाहेबांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. हा पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत सलीम खान यांनी उपस्थित मराठी रसिकजनांची मने आपल्या हृदयस्पर्शी मनोगताने जिंकून घेतली. सातासमुद्रापार आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्गजांना यावर्षीपासून 'झेंडा रोविला' हा पुरस्कार देण्यात आला असून यंदा हा पुरस्कार विख्यात वास्तुरचनाकार अशोक कोरगांवकर यांना देण्यात आला. महेश मांजरेकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यंदाच्या पाचव्या दिमाखदार 'मिक्ता' सोहळ्यात डान्स परफ़ोर्मन्स, विनोदी स्किट्स, गाण्यांच्या मैफिलींसारख्या असंख्य कार्यक्रमांची उधळण करण्यात आली होती. 

'कलर्स मिक्ता'वर यंदा चित्रपटांमध्ये 'रेगे' चित्रपटाचा दबदबा दिसून आला. सर्वोत्तम चित्रपटावर 'रेगे'ने आपली मोहोर उमटवली तर पटकथा- दिग्दर्शनासाठी अभिजीत पानसे, संवाद - प्रवीण तरडे, छायांकन - महेश लिमये, कलादिग्दर्शन - संतोष फुटाणे अशा तब्बल सहा पुरस्कारांवर 'रेगे'ने आपली छाप पाडली. 'रेगे' नंतर 'फँड्री' आणि 'लय भारी' चित्रपटाने 'मिक्ता'वर आपला झेंडा रोवलाय. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा मान किशोर कदम यांना लाभला तर सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा अवाॅर्ड देण्यात आला तसेच अलकनंदा दासगुप्ता यांना पार्श्वसंगीतासाठी सन्मानित करण्यात आले. 'अस्तू' चित्रपटानेही आपला ठसा उमटवत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मोहन आगाशे तर अभिनेत्रीचा पुरस्कार इरावती हर्षे आणि सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता सुभाष यांना देण्यात आला. 'लय भारी'च्या संगीतासाठी अजय-अतुल यांना तर शरद केळकर यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. 'यलो' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार गुरु ठाकूरना देण्यात आला तर 'टाईम पास' साठी स्वप्निल बांदोडकर हे सर्वोत्कृष्ट गायक आणि 'पोस्टकार्ड' साठी कविता कृष्णमूर्ती सर्वोत्कृष्ट गायिका ठरल्या आहेत. 'लय भारी' च्या संकलनाकरिता आरिफ शेख आणि उत्कृष्ट संगीत संयोजकाचा बहुमान 'सलाम' चित्रपटाकरिता अनमोल भावेंना देण्यात आला. 'पोश्टर बोईज'च्या यशस्वी निर्मिती पदार्पणासाठी श्रेयस तळपदे तर सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शन पदार्पणाकरिता समीर पाटील यांना गौरवले गेले. प्रेक्षकांची विशेष पसंती लाभलेल्या 'लय भारी' चित्रपटाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रितेश देशमुख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.  

नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान 'मि. अॅण्ड मिसेस' या नाटकाने पटकावला. 'झोपाळा' नाटकाला विशेष ज्युरी अवाॅर्ड देण्यात आला तर 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकास प्रेक्षकांची पसंती लाभली. पुनरुज्जीवित नाटकांमध्ये 'व्यक्ती आणि वल्ली' नाटकाने बाजी मारलीये. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रियदर्शन जाधव यांना 'मि. अॅण्ड मिसेस' या नाटकाकरिता दिला गेला तर चिन्मय मांडलेकर आणि मधुर वेलणकर यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला. शिवाय या नाटकातील प्रकाशयोजनेकारिता भूषण देसाई तसेच अपर्णा गुरम आणि मीरा वेलणकर यांना वेशभूषेसाठी गौरविले गेले. 'आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे' नाटकासाठी सहाय्यक अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तर शशांक केतकर यांना सहाय्यक अभेनेत्याचा बहुमान 'गोष्ट तशी गमतीची' नाटकाकरिता देण्यात आला. घोषित पुरस्कार 'आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे' नाटकाचे लेखक विरेन, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि संगीतकर मिथिलेश पाटणकर यांना पुरस्कार देण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment