Friday, March 20, 2015

हिंदीतील आघाडीचे संगीतकार अमर मोहिले मराठी चित्रपटनिर्मितीत



एफ. एम. इलियाज दिग्दर्शित ‘ए फायनल’ या चित्रपटाद्वारे मांडणार आंधळ्या मुलीची म्युझिकल कथा

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी चित्रपटसृष्टीत म्युझिशियन म्हणून दाखल झालेले आणि ‘ चेन्नई एक्स्प्रेस’, ‘शूटआइट अॅट वडाला’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सरकार’, ‘एक हसीना थी’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना आपल्या अविस्मरणीय पार्श्वसंगीताने चार चांद लावणारे हिंदीतील आघाडीचे संगीतकार अमर मोहिले आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. आपल्या ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’ या बॅनरअंतर्गत ते ‘ए फायनल’ या आगळ्यावेगळ्या म्युझिकल चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी चित्रपटांच्या दुनियेतील पार्श्वसंगीतातील एक आघाडीचं नाव असूनही अमर मोहिले यांनी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रनिर्मितीसाठी आवर्जून मायमराठीची निवड केली आहे.
‘अर्जुन’फेम लेखकदिग्दर्शक एफ. एम. इलियास यांनी ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’च्या या पहिल्या चित्रपटाची धुरा उचलली आहे. कथा त्यांचीच असून त्यांनी व इब्राहिम अफगाण यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद इब्राहिम अफगाण यांचे असून संगीत व पार्श्वसंगीताची बाजू स्वत: अमर मोहिले यांनी सांभाळली आहे व चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी हरप्रीतमोहिले सांभाळत आहेत.
एका आंधळ्या व्हॉयलनिस्ट मुलीची संवेदनशील गोष्ट ‘ए फायनल’ मधून मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात एफ. एम. इलियास म्हणाले की, “कितीही मोठं संकट आलं तरी आयुष्य कसं उत्फुल्लपणे जगायचं, हे सांगणारी ही गोष्ट आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात बरेवाईट प्रसंग येत असतात, पण आयुष्य ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे हिंमत न हारता आयुष्याला अतिशय प्रसन्नपणे सामोरं जायचं असतं, हे या कथेच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केला आहे.”
यातील आंधळ्या मुलीची मध्यवर्ती भूमिका साकारणं हे मोठं आव्हान असून त्यासाठी आपण योग्य अभिनेत्रीच्या शोधात आहोत. प्रस्थापित अभिनेत्रींपैकी काहींचा विचार सुरू असून काही नव्या मुलींचीही ऑडिशन घेत आहोत. संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर तोलून धरेल, अशी क्षमता असलेल्या अभिनेत्रीची आपल्याला गरज असल्याचे ते म्हणाले.
अमर मोहिले यांनी चित्रपटनिर्मितीत प्रवेश करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “ज्येष्ठ संगीतकार व दिवंगत वडील अनिल मोहिले यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला होताच. त्या जोरावर हिंदीत पार्श्वसंगीतकार म्हणून यशस्वी झालो. पण निर्माता झालो तर पहिला चित्रपट मराठीच करायचा, हे आपण ठरवलं होतं. एफ. एम. इलियास यांच्या ‘भाई कोतवाल’ या चित्रपटाचं संगीत करत असतानाच त्यांच्याकडून ही कथा ऐकली, तेव्हा या चित्रपटाचीनिर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला,” असं अमर मोहिले म्हणाले.

No comments:

Post a Comment