Thursday, October 2, 2014

'आता होऊ द्या खर्च'

निवडणुकीत 'आता होऊ द्या खर्च' चा सूर .. 
'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' संगीत प्रकाशित 


 
 
निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत.  याच पाश्वभूमीवर नविन सिंग आणि राकेश आर. भोसले निर्मित 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा धमाकेदार मराठी चित्रपट येतोय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही रुचेल अशा वास्तवदर्शी कथानकावर हा चित्रपट बेतला असून बाळकृष्ण शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. चित्रपटाचा विषय निवडणुक आणि राजकारणावर बेतलेला असल्याने याच्या संगीतात देखील याची खास झलक पहायला मिळणार आहे. पंकज छ्ल्लानी प्रस्तुत 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा राजकीय व्यंगपट येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय; तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि आशिष विद्यार्थी यांच्या हस्ते 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' ची गीत ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' चित्रपटात दोन गीते असून दोन्ही गीते श्रवणीय आणि रंगतदार झाली आहेत. यातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर 'आता होऊ दया खर्च' ही रेश्मा सोनावणे त्यांच्या आवाजातील ठसकेदार लावणी गीत प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या गीताचे शब्द अरविंद जगताप यांचे असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. मराठीत प्रथमच निऑन कलर्सचा वापर करून या गीताचे सादरीकरण करण्यात आले असून प्रेक्षकांना ते पडद्यावर पाहताना त्यातील वेगळेपण जाणवेल. या सोबत 'नटरंगी नार' हे उर्मिला धनगर यांच्या आवाजातील गीत देखील प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार आहे. 

'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल असलेल्या 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' चित्रपटात प्रेक्षकांना नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा अधिक मनोरंजकतेने पहायला मिळणार आहे.  'सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स' च्या या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. सिनेमाचे छायांकन सुरेश सुवर्णा यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन अमित बाईंग, कला दिग्दर्शन संदीप इनामके यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते बाबासाहेब पाटील असून वितरणाची जबाबदारी 'पिकल एन्टरटेनमेंट' सांभाळीत आहेत. 
 
मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या लक्षवेधी भूमिका असलेल्या या चित्रपटात हिंदी ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ आणि आशिष विद्यार्थी देखील विशेष भूमिकेत दिसणार आहे. 'एस. एम. एस. इंटरटेनमेंट' प्रस्तुत, या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांच्यासह डॉ. विलास उजवणे, स्वप्नील राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके, विनीत भोंडे, मेडेलीना अलेक्झांड्रा, पूर्णिमा अहिरे, रसिका वझे, ज्योती जोशी, शरद शेलार, विनोद खेडकर, उज्वला गोड या कलाकारांच्या भूमिका आहेत.  १० ऑक्टोबरला 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' चित्रपटगृहात दाखल होतोय; त्यापूर्वी यातील सुरेल गीते निवडणुकीच्या रणधुमाळीत निश्चितच धमाल उडवून देणार आहेत.

No comments:

Post a Comment