Saturday, August 9, 2014

स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा'



स्त्री मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह
स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' प्रकाशित 









स्पृहा जोशी.. रंगभूमी, मालिका, चित्रपटात अल्पावधीत नावारूपास आलेली एक संवेदनशील अभिनेत्री. 'गमभन', 'युग्मक', 'एक अशी व्यक्ती', 'अनन्या' सारख्या एकांकिका, 'लहानपण देगा देवा', 'नेव्हर माईंड', 'नांदी' सारखी नाटके, 'मायबाप', 'मोरया', 'सूर राहू दे', 'बायोस्कोप' मधील 'एक होता काऊ' या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चमक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'दे धमाल', 'आभाळमाया', 'आग्निहोत्र' या मालिकांमधून अभिनय केलेल्या स्पृहाला 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' आणि 'उंच माझा झोका' या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. अभिनयासोबतच लेखनाची विशेष आवड असणाऱ्या स्पृहा जोशीने काही वृतपत्रांसाठी सदर लेखन केलंय. २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या 'चांदणचुरा' या तिच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला रसिक काव्यप्रेमीचे विशेष प्रेम लाभले होतं. कविता लेखनात विशेष रस असणाऱ्या स्पृहाचा 'लोपामुद्रा' हा दुसरा काव्यसंग्रह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, 'तारांगण प्रकाशना'च्या वतीने नुकताच प्रकाशित झाला आहे. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यावेळी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, निर्माता-दिग्दर्शक- अभिनेता सचिन पिळगांवकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी सचिन पिळगांवकर यांच्याहस्ते 'लोपामुद्रा'च्या ई बुकचे ही प्रकाशन करण्यात आले.
यावेळी 'लोपामुद्रा' या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते, यात गेल्या शतकातील स्त्री कवयत्रींच्या कवितांचा मागोवा सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी घेतला. यात सुबोध भावे, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, अमृता सुभाष, वीणा जामकर, सिद्धार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे आणि स्पृहा जोशी यांचा सहभाग होता. या काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर व स्पृहा जोशी यांनी केले. 'लोपामुद्रा' या कवितासंग्रहामध्ये 'साखरजाग', 'जाग', 'माध्यान्ह' आणि 'निरामय' या चार भागांमध्ये या भावना उलगडत गेल्या आहेत. या कविता संग्रहासाठी सुमीत पाटील यांनी समर्पक चित्रे रेखाटली असून कवी अरुण म्हात्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
कोणत्याही कलाकृतीचे शीर्षक हे त्या कलाकृतीचा चेहरा असतं. स्पृहाने तिच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाला 'लोपामुद्रा' हे अनोखं शीर्षक दिलंय. 'लोपामुद्रा' म्हणजे जिची मुद्रा एखाद्या व्यक्तीमध्ये लोप पावली आहे, एकरूप झाली आहे ती. पररुपाशी एकरूपता साधली असली तरी तिला स्वरूपाचा विसर पडलेला नाही. स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून समोरच्या व्यक्तीशी एकरूप होण्याची कला या 'लोपामुद्रेला' अवगत आहे. स्त्री, महिला, नारी, ललना हे एकमेकांचे समानार्थी शब्द असले तरी प्रत्येकाचा शब्दार्थ वेगळा आहे. प्रत्येक शब्दाची अर्थछटा निराळी आहे. तरी त्यात एक समान धागा आहे. स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' काव्यसंग्रहातल्या कविता ती च्या भोवती गुंफलेल्या असल्या तरी या प्रत्येक कवितेतल्या 'ती' ची वेगळी ओळख आहे. या सगळ्या लोपामुद्रा आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अनुभव आणि स्वनुभवानुसार स्त्रीची भूमिका, तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना बदलत जातात. पत्रकार- संपादक मंदार जोशी यांच्या 'तारांगण प्रकाशना'तर्फे स्पृहा जोशी लिखित 'लोपामुद्रा' काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment