Wednesday, May 28, 2014

'एकता एक पॉवर' ६ जून ला चित्रपटगृहात

'एकता एक पॉवर' ६ जून ला चित्रपटगृहात  




देशात एकात्मता, बंधुभाव कायम राहणे; प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही नेहमीच महत्त्वाचे ठरते. पण अलीकडे देशात जातीमध्ये, धर्मांमध्ये तेढ वाढते असून समाजात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याकडेच कल दिसून येतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच तीव्र होतात. याच पार्श्वभूमीवर खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखीत करणारा 'एकता एक पॉवर' हा मराठी चित्रपट ६ जून ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'राहुल इंटरप्रायजेस' प्रस्तुत, 'अश्विनी राहुल इंटरप्रायजेस' चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित 'एकता एक पॉवर' चित्रपटाचे दिग्दर्शन के. विलास यांनी केलंय.  

धर्म, भाषा, रितीरिवाज यापलीकडे माणूसकी आणि त्याच्या एकीचे बळ नेहमीच श्रेष्ठ आहे. सामाजिक एकात्मतेचे महत्त्व सांगणारी कथा 'एकता एक पॉवर' चित्रपटातून रेखाटण्यात आली असून यात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर, विद्याधर जोशी, श्रीकांत शिंदे, श्याम ठोंबरे, श्रद्धा सागांवकर, अनुप चौधरी, स्नेहल कांबळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक के. विलास यांनीच चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिलेत. के. विलास यांनी लिहिलेल्या चित्रपटातील चार गीतांना सलील अमृते यांचं संगीत लाभलं असून यात वेगवेगळ्या शैलीतील गीतांचा समावेश आहे. 

यातील 'एकता एक पॉवर' हे शीर्षक गीत गायक नंदेश उमप आणि नेहा राजपाल यांनी गायलं असून 'प्रेम झालं ग मला' हे प्रेमगीत स्वप्निल बांदोडकर व किर्ती किल्लेदार यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. चित्रपटात एक 'कबड्डी' सॉंग असून गायक आदर्श शिंदे यांच्या जोशिल्या आवाजात ते स्वरबद्ध झालंय. यासोबतच रेश्मा सोनावणे यांच्या ठसकेदार आवाजातील 'पाव्हणं लाईन मारने का नई' हे आयटम सॉंग धमाल उडवून देणार आहे. मानसी नाईक यांच्यावर चित्रीत झालेल्या या गीताचे नृत्य दिग्दर्शन 'डी आय डी' फेम सिद्धेश पै यांनी केलंय. 'अल्ट्रा डिस्ट्रीब्यूटर्स' चे जयेश वीरा यांच्यातर्फे चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण गोपाल डे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन विहार घाग, अनिल सुतार, सिद्धेश पै, राजेश पडवळे यांनी केलंय. राज सुर्वे यांनी चित्रपटाचे संकलन केले असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी राजेंद्र व सचिन शिंदे यांनी सांभाळली आहे. 

विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा मैदानावरचा खेळ. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा 'एकता एक पॉवर' हा चित्रपट येत्या ६ जून ला प्रेक्षकांचे मनोरंजन करायला प्रदर्शित होतोय.  



 

No comments:

Post a Comment