Sunday, May 11, 2014

'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'मध्ये समृद्धी पोरे यांच्या 'हेमलकसा'ची निवड

'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'मध्ये समृद्धी पोरे यांच्या 'हेमलकसा'ची निवड 

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यावर आधारित चित्रपटाला समारोपाचा विशेष बहुमान 
   


मराठी सिनेमा जागतिक पातळीवर गौरविला जात असून निरनिराळ्या प्रतिष्ठीत फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होतोय. याच दिशेने निर्मात्या- दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या बहुचर्चित मराठी चित्रपटाची व 'हेमलकसा' या हिंदी सिनेमाची घौडदोड सुरु आहे. प्रदर्शनाआधीच देश-विदेशातील चित्रपट समीक्षक आणि जाणकारांचा या सिनेमांना उत्तम प्रतिसाद मिळत असून नुकतेच त्यांच्या हेमलकसा या हिंदी चित्रपटाची 'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'च्या  स्पर्धा विभागात निवड झाली आहे. कोणत्याही फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या आणि समारोपाच्या सिनेमाला विशेष महत्त्व असते, हे लक्षात घेता 'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'मध्ये 'हेमलकसा' चित्रपटाला खास समारोपाच्या सिनेमासाठी निवडण्यात आले असून हा या चित्रपटाला मिळालेला विशेष बहुमानच म्हणावा लागेल. समृद्धी पोरे आणि नाना पाटेकर यांना यासाठी लंडन येथे उपस्थित राहण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.  

सामाजिक विषयाच्या या सिनेमाला अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपट अभ्यासकांनी गौरविले असून प्रत्येकासाठीच हा सिनेमा एक वेगळा अनुभव ठरतोय. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची कथा निर्मात्या-दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी रेखाटली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठी व हिंदी अशा दोन भाषांमध्ये स्वतंत्रपणे बनविण्यात आला आहे. मराठीत  'डॉ. प्रकाश बाबा आमटे' हे शीर्षक असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हिंदीत बनविण्यात आलेला 'हेमलकसा' प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या सहजीवनाची भावस्पर्शी कथा नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयातून साकारली आहे. 'समृद्धी सिने वर्ल्ड' निर्मिती संस्थेच्या या सिनेमाचे विशेष म्हणजे गेली अडीज वर्ष या चित्रपटावर कार्यरत असणाऱ्या समृद्धी पोरे यांनी प्रत्यक्ष हेमलकसा येथे जाऊन त्या वातावरणात चित्रीकरण केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे हे नाव आज महाराष्ट्र व देशापुरतंच मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी निर्मात्या समृद्धी पोरे प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत परदेशात कॅनडा, युरोप, सिंगापूर, रोम आदी ठिकाणी अनेक अभ्यासकांनी ह्या सिनेमाची विशेष प्रशंसा केली आहे. 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या 'इंडस्ट्रीअल स्क्रिनिंग' विभागात या सिनेमाची निवड झाली असून समृद्धी पोरे तेथेही हा सिनेमा घेऊन जाणार आहेत. शिवाय जागतिक चित्रपट महोत्त्सवांमध्ये या चित्रपटाला प्रचंड मागणी असून हा सिनेमा तेथे दाखविण्यासाठी निर्मात्या सर्वोतोपरी कार्यरत आहेत.    

१० ते १७ जुलै दरम्यान 'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'चे आयोजन होणार असून त्यावेळी 'हेमलकसा' हा चित्रपट तेथे दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आणि मानसन्मानामुळे निर्मात्या समृद्धी पोरे यांनी आनंद व्यक्त केला असून प्रेक्षकांच्याही तो पसंतीस उतरेल असा त्यांना विश्वास आहे. हा सिनेमा जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हा त्यांचा मानस आहे.  

No comments:

Post a Comment